पुणे – महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळाच्या वतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना २० मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे.
कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळामार्फत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी यापूर्वी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. परंतु ही सीईटी परीक्षा ३१ मे ते २ जून या कालावधीत नियोजित केली आहे.
त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी दिली आहे. या परिक्षेसंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. देठे यांनी केले आहे.