पुणे – करोना प्रादुर्भावाची दररोजची आकडेवारी दीड हजारांनी वाढत असताना नागरिकांमध्ये अद्यापही पुरेसे गांभीर्य नाही. तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ खाऊन रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरता घराबाहेर पडणे आणि गर्दीच्या ठिकाणी फिरणे हे सगळे प्रकार सर्रास दिसत आहे. मात्र, या सगळ्यांवर गेल्या चार महिन्यांत म्हणावी तशी कारवाई झाली नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रशासनाला चांगलेच खडसावले असून, कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता थुंकीबहाद्दर आणि विनामास्क वाल्यांवर कारवाई केली जाणार आहे.
मे ते ऑगस्ट या चार महिन्यांत मास्क न वापरणाऱ्या केवळ 618 जणांवर कारवाई केली गेली. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता करणे, घाण करणे अशा कृतीसाठी क्षेत्रीय कार्यालयांमार्फत दंडात्मक कारवाई केली जाते. पण, या थुंकीबहाद्दरांवर जरब बसलेला नाही.
याबाबत नागरिकांकडून तक्रारीही केल्या जात आहेत. त्यामुळे दंडाची रक्कम आता 1000 रुपये करण्यात आली आहे. तसे पत्र विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेला पाठवले होते. पालिका आयुक्तांकडून याबाबतचे आदेश शहरासाठी लागू करण्यात आले आहेत.
पोलिसांनाही असतील अधिकार
सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास यापूर्वी 100 रुपयांचा दंड आकारला जात होता. यापुढे 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक यांना दंडआकारणीचे आणि पुढील कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तसेच ही कारवाई अधिक प्रभावी आणि परिणामकारक होण्याच्या दृष्टीने सर्व पोलिसांनाही हे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.