पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत परवाना आणि योग्यता प्रमाणपत्राच्या कोट्यात वाढ करण्यात आली आहे. सुधारित कोटा दि.7 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता खुला होणार आहे.
यासह संगणक प्रणालीचे अद्ययावतीकरण न झाल्यामुळे 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीतील जिल्ह्यातील शिबिर कार्यालये रद्द केली असून या शिबिरांचे या महिन्यात अन्य उपलब्ध तारखांना नियोजन करण्यात येणार आहे.
शिकाऊ परवाना आणि पक्क्या परवान्यासह अन्य कामकाजासाठी संगणक प्रणालीमध्ये ऑनलाइन पद्धतीने दैनंदिन कोटा निश्चित केला आहे. या कोट्यात सुधारणा करण्यात येणार असून शिकाऊ परवान्याचा कोटा 300हून 400 करण्यात आला आहे.
तर कायम परवान्याचा कोटा 300हून 500 करण्यात येणार आहे. यासह दिवे येथे होणाऱ्या योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठीचा दैनंदिन कोटा देखील वाढविण्यात आला आहे. ऑटोरिक्षाचा कोटा 50हून 75 आणि मालवाहू वाहनांचा कोटा 130हून 200 करण्यात येणार आहे, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले.