आणखी एक लाख किट खरेदीस महापालिकेची मान्यता
पुणे – करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या तसेच हायरिस्कमधील रुग्णांची तातडीने करोना चाचणी करण्यासाठी महापालिकेकडून मागील महिन्यांपासून शहरात रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट करण्यात येत आहेत. आतापर्यंत पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुमारे 71 हजार 622 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे तब्बल 15 हजार 172 बाधित रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, टेस्ट किट संपल्याने महापालिकेने नुकतेच आणखी एक लाख किट खरेदीस मान्यता दिली आहे.
शहरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच अनलॉक-1 जाहीर झाल्यानंतर 17 जून पासून शहरात करोनाबाधितांची संख्या वाढली होती. तर, तुलनेने चाचण्यांची संख्या कमी पडत होती. त्यामुळे अवघ्या अर्ध्या तासात करोनाची तपासणी करण्यासाठी पालिकेने सुमारे साडेचार कोटी खर्च करून रॅपिड ऍन्टिजेन टेस्ट खरेदी केले होते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली. त्यानंतर, पुन्हा 14 ते 24 जुलै हा दहा दिवसांचा लॉकडाऊन शहरात जाहीर करण्यात आला, या कालावधीत पालिकेकडून या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली होती.
प्रसार रोखण्यात यश…
ऍन्टिजेन टेस्ट किटद्वारे चाचण्या केल्याने सुमारे 15 हजार बाधित वेळीच विलग करून त्यांच्यापासून होणारा करोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास यश आले आहे. तर, आता या ऍन्टिजेन किटद्वारे शहरातील व्यापारी, महापालिकेचे फिरते दवाखाने तसेच काही कोविड केअर सेंटरवर चाचण्या केल्या जात असून रुग्ण कमी होत असल्याने या चाचण्यांचे प्रमाणही कमी करण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.