‘मेक इन इंडिया’सोबतच ‘मेक फॉर वर्ल्ड’चा पंतप्रधानांचा नारा

74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी केले देशाला संबोधित


नवी दिल्ली :
देशाचा आज 74 वा स्वातंत्र्यदिवस असून त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. करोनाने सगळ्यांवर मर्यादा आल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच करोना काळात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. 130 कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने करोनावर विजय मिळवू असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल, मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. एक काळ होता, ज्यावेळी आपली शेतीव्यवस्था अतिशय मागास होती, तेव्हा देशवासियांचं पोट कसं भरणार ही सर्वात मोठी चिंता होती. आज आपण केवळ भारताचेच नाही तर जगातील अनेक देशांचे पोट भरु शकतो. देशात कोरोनाच्या आधी एन 95- मास्क, व्हेंटिलेटर, पीपीई किट बनत नव्हते. पण आपल्या उद्यमशीलतेने ते करुन दाखवले. आज आपण या गोष्टी निर्यातही करु लागलो आहे. आज जगातील अनेक मोठ्या कंपन्या भारतात येत आहेत. आता आपल्याला मेक इन इंडियासोबतच मेक फॉर वर्ल्ड या मंत्रासह पुढे जायचे आहे.

एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे. वोकल फॉर लोकल जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या FDI गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. करोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर FDI गुंतवणूक झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.