पुणे – प्लाझ्मा दान करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना जर प्लाझ्माची आवश्यकता भासल्यास प्राधान्याने त्या व्यक्तीला प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, ससून रुग्णालयातून इतर खासगी व शासकीय रुग्णालयातील रुग्णांना प्लाझ्माची आवश्यकता भासल्यास ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
करोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राव यांनी केले आहे. यासाठी जनजागृती करण्यासाठी उद्यापासून (दि.15) मोहिम सुरू करण्यात येणार आहे. ससून रुग्णालयामध्ये प्लाझ्माच्या 500 बॅग उपलब्ध आहेत.
करोनाच्या 154 रुग्णांना प्लाझ्मा थेरपीने उपचार केले असून यातील 7 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे राव यांनी सांगितले. अत्यवस्थ रुग्णांना योग्य वेळी प्लाझ्मा दिली गेली पाहिजे, अशा रुग्णांवरही प्लाझ्मा थेरपी उपयोगी पडत असल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.