लखनौ/मथुरा – अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या त्यांच्यावर गुडगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात अयोध्येत पार पडलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा त्यांच्या संपर्कात आले होते.
महंत नृत्यगोपाल दास यांना आज सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांची करोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आता त्यांच्या संपर्कातील लोकांचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. नरेश त्रेहान यांनी दिली. महंत नृत्यगोपाल दास करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठराविक लोकांनाच कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. मंचावरही फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते.
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यावेळी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते. मंचावर महंत नृत्यगोपाल दास आणि नरेंद्र मोदी यांच्यासहित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचलाक मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या.