विठ्ठल लांडगे
नगर -सेवानिवृत्त शिक्षक नेते द. मा. ठुबे गुरुजी यांचे चिरंजीव आणि गुरुमाऊली मंडळातील रोहोकले गटाचे नेते तथा शिक्षण परिषदेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांचे बंधू मंगेश ठुबे यांच्याभोवतीन बॅंकेचे राजकारण फिरत असल्याचे स्पष्ट होत आहे. ठुबे यांच्या बॅंकेतील नोकरीच्या विषयावरुनच प्रकरण हाताघाईवर आल्याचे आता लपून राहिलेले नाही.
गुरुमाऊली मंडळातील तांबे गटानेही हाच प्रश्न प्रतिष्ठेचा केल्याने प्रकरण थेट एकमेकांचे परिवार संपविण्याची धमकी देण्यापर्यंत पोचल्याचे शिक्षक नेत्यांनी आज “प्रभात’ला सांगितले.
शिक्षक नेते द. मा. ठुबे यांचे चिरंजीव मंगेश बॅंकेत शिपाई म्हणून रजू झाले. त्यावेळी बॅंकेत सदिच्छा मंडळाचीच सत्ता होती. त्यानंतर गुरुकुल व ऐक्य मंडळाचे एकत्रित पॅनेल करुन निवडणूक लढविली. त्यात सदिच्छा मंडळाचा धुव्वा उडाला. सत्ता ताब्यातून गेली. त्याचे दु:ख सहन न झाल्यानेच ठुबे यांनी बॅंकेतील नोकरी करणे बंद केल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला.
दरम्यान, त्यानंतर बॅंकेत पुन्हा सदिच्छा मंडळाची सत्ता आली. मात्र, त्या काळात ठुबे यांच्याविषयी निर्णय घेण्यात आले नाहीत. त्यातून दस्तुरखुद्द द. मा. ठुबे गरुजी नाराज होते. पुढे सदिच्छा मंडळाच्या कारभाराला कंटाळून बाहेर पडलेल्या ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहोकले यांनी गुरुमाऊली नावाने स्वतंत्र मंडळ उभे केले. त्यात त्यांना बापू तांबे यांची साथ लाभली. गुरुमाऊली मंडळाची बॅंकेत एकहाती सत्ता आली.
मात्र, गुरुमाऊली मंडळास मदत करण्याच्या बदल्यात शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले यांनी त्यावेळी द. मा. ठुबे यांना मंगेश यांच्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते, असे सांगितले जाते. त्याची पूर्तता करण्यासाठी ठुबे यांचे बडतर्फ शिपाई चिरंजीव मंगेश यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेत त्यांना शिपाईपदावरुन थेट लिपिक पदावर बसविण्याचे नवे आश्चर्य रावसाहेब रोहोकले यांनी करुन दाखविल्याचे सांगितले जाते.
त्यानंतर बॅंकेतील राजकारणावरुन गुरुमाऊलीतच पुन्हा दोन गट निर्माण झाले. त्यात रोहोकलेही सेवानिवृत्त झाले. त्यांची “पॉवर’ खलास झाली. बॅंकेत तांबे गट पुन्हा पॉवरफुल्ल झाला आहे. त्या गटाच्या संचालक मंडळाचे मंगेश ठुबे यांच्याविषयी प्राप्त झालेल्या तक्रारींवरुन नियमानुसार ठुबे यांच्या वेतनवाढी रोखल्या. त्यातून हे राजकारण पुन्हा तापले आहे. मात्र, एका लिपिक वर्गातील कर्मचाऱ्याभोवतीच बॅंकेचे इतके राजकारण व्हावे आणि शिक्षक नेत्यांनी ही लढाई प्रतिष्ठेची करावी, हेच मुळात दुर्देवी असल्याची टीका शिक्षक करत आहेत.
“गुरुकुल’चे नव्हे; तांबे “गुरुमाऊली’चेच नेते..!
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बापू तांबे यांचा कालच्या बातमीतील मथळ्यामध्ये अनावधाने “गुरुकुल’च्या तांबेंना, असा उल्लेख झाला. मात्र, बापू तांबे गुरुकुल मंडळाचे नव्हेत, तर गुरुमाऊली मंडळाचे नेते आहेत. सध्या बॅंकेची सत्ताही त्यांच्याच गटाच्या ताब्यात आहे. तांबे यांचा “गुरुकुल’चे नेते असा उल्लेख झाल्याने शिक्षकांत गोंधळ उडाला होता.
सदिच्छा मंडळ बॅंकेतून पायउतार झाल्याचे दु:ख झाल्याने मोठ्या नेत्याचा मुलगा असलेल्या मंगेश ठुबे या शिपाई कर्मचाऱ्याने बॅंकेत येणेच बंद केले. बॅंकेने त्यांना कामावर हजर होण्यासंदर्भात नोटीसा बजावल्या. त्यानंतर सेवानिवृत्त अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली. चौकशी समितीने हे गैरवर्तनच असल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला. त्यानंतरही मंगेश ठुबे यांना कामावर हजर होण्यासंदर्भात अंतिम नोटीस बजावली होती. मात्र, त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर नियमानुसार त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. गुरुमाऊलीचे नेते रावसाहेब रोहोकले यांनी पुन्हा कशाच्या आधारावर बडतर्फ शिपाई कर्मचारी ठुबे यांच्यावरील कारवाई मागे घेऊन त्यांस चक्क लिपिक पदावर पदोन्नती दिली, हे अजुनही आम्हालाच समजलेले नाही.
संजय धामणे
तत्कालीन अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक.