शिराळा (प्रतिनिधी) : कोविड-19 उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या कोणत्याही रूग्णालयांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा नसून पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. एखाद्या रूग्णालयातील ऑक्सिजन संपल्यास पुरवठादाराकडून अत्यंत अल्प काळात तो उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
यावेळी त्यांनी अंगीकृत खाजगी रूग्णालयांनाही प्रशासन आवश्यक पाठबळ देत आहे. खाजगी रूग्णालयानीही रूग्णांच्या प्रती असणाऱ्या आपल्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून स्वत:हून रूग्ण सेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन करून कोरोना महामारीशी संपूर्ण जग झुंज देत असताना जी रूग्णालये रूग्ण सेवा नाकारतील अथवा त्यामध्ये टाळाटाळ करतील त्यांची नोंदणी रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्रांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस उपस्थित होते. अंगीकृत केलेल्या कोविड रूग्णांलयामध्ये बिल आकारणीबाबत पारदर्शकता असावी. बिलांबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी उपस्थित होऊ नयेत. यासाठी बिल तपासणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक प्रत्येक हॉस्पिटलला नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सध्या उपलब्ध असणाऱ्या बेड्सच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात येणार असून यासाठी इस्लामपूर, विटा सारख्या शहरांमध्ये खाजगी रूग्णालये कोविड उपचारासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
यावेळी जे कोविड बाधित रूग्ण रूग्णालयांमध्ये ॲडमिट आहेत त्यांची माहिती नातेवाईकांना मिळावी यासाठी हेल्पडेस्क तयार करण्यात येणार असल्याचे सांगून प्रिस्क्रीप्शनवरील औषधे दुकानदारांकडून उपलब्ध होतीलच पण किरकोळ आजारांवरील औषध विक्रीलाही कोणतेही बंधन नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.