शिराळा (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या परंतु शेजारील जिल्ह्यात शेती असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील कामे करण्यासाठी ये-जा करण्याकरिता दैनंदिन पास देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकरी, शेतीपुरक, शेतीसंलग्न व्यवसाय यांच्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून ऑनलाईन पास देण्याची सुविधा दि. ३ ऑगस्ट २०२० पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.
पाससाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्ज करणाऱ्यास टोकन आय डी उपलब्ध होणार आहे. या टोकन आयडी वरून अर्ज करणारे आपल्या पासची सद्यस्थिती पाहू शकणार आहेत. ऑनलाईन पाससाठी dsaosangli.com/onlineform/epass ही लिंक असून फोटो, ओळखपत्र (आधार कार्ड), मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र ७ दिवसांच्या आतील, शेतकरी असल्यास 7/12 / शेतीसंलग्न व्यवसाय असल्यास कंपनीचे पत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.