विद्यार्थ्यांचे हाल : सहा महिने उलटल्यानंतरही प्रतीक्षा
पिंपरी – महाविद्यालयीन प्रवेशासाठी लागणारा अधिवास दाखला (डोमिसाइल प्रमाणपत्र) मिळण्यासाठी विलंब होत असल्याने विद्यार्थी व पालकांची सध्या मोठी गैरसोय होत आहे. लॉकडाऊनमुळे फेब्रुवारीत अर्ज केलेल्या काही अर्जदारांना सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप डोमिसाइल दाखले मिळालेले नाहीत. हे दाखले तातडीने मिळावे, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
महाविद्यालयीन प्रवेशासाठी राज्यातील रहिवासाचे प्रमाणपत्र म्हणून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) लागते. हे प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यास महाविद्यालयीन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन बऱ्याच जणांनी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालय येथे असलेल्या नागरिक सुविधा केंद्रात अर्ज केला. मात्र, त्यांना अद्याप दाखले मिळालेले नाही. तांत्रिक अडचणीमुळे दाखले मंजूर करण्यास अडचण येत आहे. तरी आपण पुन्हा ऑफलाइन पद्धतीने नायब तहसीलदार यांच्याकडून मंजूर करून नवीन अर्ज ऑनलाइन दाखल करावा, असे संदेश त्यांना पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज केलेले आहेत. मात्र, बऱ्याच जणांना अद्याप डोमिसाईल दाखले मिळालेले नाही.
ऑनलाइन 130 दाखले
डोमिसाईलसाठी महाराष्ट्रात 15 वर्षांपासून रहिवाशी असल्याचा पुरावा अर्जदारांकडे असणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार मिळकत कर पावती, मालमत्तेचा पुरावा गरजेचा आहे. सध्या 22 तारखेपर्यंतचे डोमिसाइल दाखल्यांचे काम आम्ही पूर्ण केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत किंवा तत्पूर्वी अर्ज केलेल्या रहिवाशांच्या दाखल्यांची कामे लॉकडाऊनमुळे होऊ शकलेली नाही. त्यांना आम्ही पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे. दाखल्यांसाठी अर्ज करण्यासाठी अप्पर तहसील कार्यालयामार्फत ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिल्यानंतर आत्तापर्यंत त्या माध्यमातून 130 ऑनलाइन दाखले देण्यात आले आहेत. डोमिसाइल, उत्पन्न व अन्य असे सुमारे 1200 दाखले कार्यालयामार्फत दररोज दिले जात आहेत, अशी माहिती तहसीलदार गीता गायकवाड यांनी दिली.
अशी आहे ऑनलाइन प्रक्रिया
विद्यार्थी डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकतात. राज्य सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती भरल्यानंतर नागरिकांना त्यांच्या ई-मेल आयडीवर डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र मिळू शकेल. या वेबसाइटला तांत्रिक अडचण आल्यास https://apparpcmc2020.blogspot.com/2020/07/blog-post.html या अप्पर तहसील कार्यालयाच्या संकेतस्थळावर देखील नागरिक ऑनलाइन नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी 020-27642233 या दूरध्वनी क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन अप्पर तहसील कार्यालयाने केले आहे.
मुलाच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी मी 13 मार्चला आकुर्डी येथील नागरिक सुविधा केंद्रात डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे. पुण्यामध्ये मी गेल्या 30 वर्षांपासून राहण्यास आहे. त्यामुळे राज्यातील रहिवासाबाबतची सर्व कागदपत्रे मी दिलेली आहेत. सध्या दाखल्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे मला सांगण्यात आले आहे.
– एस. जे. डिसोझा, पालक.