डॅशबोर्ड आणि प्रसिद्धीपत्रकात ताळमेळचा अभाव : नवीन 910 रुग्णांची भर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. आजपर्यंत शहरात 441 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र महापालिका प्रशासनाने 421 मृत्यू दाखवत तब्बल 24 मृत्यू लपविले आहे. आजपर्यंत शहरातील 357 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केवळ 335 मृतांचीच नोंद करण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार महापालिकेने दर्शविलेली आकडेवारी ही रात्री साडे आठपर्यंतची आहे. परंतु डॅशबोर्डला सायंकाळी सात वाजे दरम्यानच 356 मृत्यू दर्शविण्यात आले होते.
शहरात शुक्रवारी 873 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील 37 जणांचे असे 910 तपासणी अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 21,193 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 3852 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 325 रुग्णांचाही समावेश आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार शहरात आजपर्यंत 421 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 335 व शहराबाहेरील 86 रुग्णांचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात यामध्ये मोठी तफावत आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये महापालिका प्रशासनाकडून दररोज लपवाछपवी केली जाते. महापालिकेच्या डॅशबोर्डनुसार शहरात आजपर्यंत 441 मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये शहरातील 357 तर शहराबाहेरील 84 जणांचा समावेश आहे. मात्र पालिकेने शहरातील 335 व शहराबाहेरील 86 मृत्यू दाखविले आहेत.