करोनाच्या भीतीने नव्या भाडेकरूंना सदनिका देण्यास मालकांना सोसायटीतून विरोध
– महादेव जाधव
फुरसुंगी – करोनाच्या भीतीमुळे नव्या भाडेकरूंना सदनिका भाडेतत्त्वावर देण्यास सोसायटीतील सभासदांचा सदनिका मालकांना विरोध होत आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण सोसायट्यांसाठी प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. मात्र, अनेक संस्थांना त्याबाबत माहिती नाही. त्यामुळे कोणी घर भाडेत्त्वावर देता का घर… अशी विनवणी करीत गरजूंना शहरभर फिरावे लागत आहे.
करोना विषाणूने शहरात थैमान घातल्यानंतर लॉकडाऊन झाले. ते नंतर शिथिल झाले आता पुन्हा दहा दिवसांचे लॉकडाऊन संपले, यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले यातून आर्थिक अडचणी वाढल्या. याच करणातून अनेकांनी नवी नोकरी मिळेल तेथे किंवा पहिल्या पेक्षा कमी भाडे असेल असे घर शोधण्यास सुरुवात केली. शिवाय, दरवर्षी मे-जून मध्येच अनेकांचे भाडेकरार संपलेले असल्याने तसेच भाडे थकलेल्या कारणानेही अनेक भाडेकरूंना घर खाली करण्यास सांगितले आहे. करोनामुळे अन्य उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने सदनिकांचे भाडे वाढविण्यास मालकांनी सुरुवात केली आहे. यामुळेच अनेकांना लो-बजेटमध्ये भाडे असेल, असे घर हवे असल्याने नव्या घरांची, सदनिकांची शोधाशोध सुरू झाली आहे.
लॉकडाऊनमुळे उपनगरांतील बहुतेक मंडळी गावी परतल्याने अनेक सदनिका, घरे रिकामी झाली आहेत. शहरात करोना प्रतिबंधित क्षेत्र वाढले आहेत. त्यामुळे सदनिकांसाठी उपनगर परिसरांत सदनिका भाडेतत्त्वावर घेण्यास अनेक जण प्राधान्य देत आहेत. परंतु, करोनाच्या भीतीने आपल्या कॉलनी, इमारतीत नवा भाडेकरू नको, अशी भूमिका अनेक गृह सोसायट्यांनी घेतली आहे. त्यामुळे नवे भाडेकरूंना सदनिका देण्यास मालकांनाही सोसायटी सभासदांचा विरोध होऊ लागला आहे.
उपनगरांतील काही चांगल्या गृह सोसायट्यांनी तर स्वत:चे कठोर नियम लागू केल्याने तेथील इमारतीतील सदनिका भाड्याने देणे आणि मिळणे कठीण झाले आहे. यातून कर्जाचे हप्ते भरण्याचा प्रश्न मालकांपुढे उभा राहिला आहे.
सोसायट्यांना सूचनाच माहीत नाहीत…
प्रशासनाने गृहनिर्माण संस्थांसाठी करोनाच्या कालावधीत काही मार्गदर्शक सूचना स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या आहेत, त्यानुसार संस्थेच्या आवारात बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशाबाबतही मार्गदर्शन केले आहे. मात्र, या सूचना अनेक संस्थांना माहीत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळेच नवीन कुटुंब, व्यक्तीला आवारात घेण्याबाबत काही संस्था संबंधितांकडे करोना चाचणी करून घेण्याची मागणी करतात. नव्या भाडेकरूंना सदनिका देण्याबाबत यातूनच विरोध होत आहे.
स्थानिक प्रशासन नाची नियमावली काय आहे ती नियमावली ची पूर्ण माहिती भेटेल का ? अशी नियमावलीची प्रत उपलब्ध करून देऊ शकता का ?