मुंबई – देशातील सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या ही राज्यातील असून करोनाचा संसर्ग काही कमी होताना दिसत नाही. आता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकाला करोनाची लागण झाला आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन पुढील महिन्यात घेण्याची तयारी राज्य सरकारने घेतली आहे. त्यातच आता विधानसभा अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला करोना झाल्याने अधिवेशनावरील ढग गडद झाल्याचे दिसून येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकाची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता विधानभवनातील नाना पटोले यांच्या कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य चाचणी करण्यात येणार आहे.
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. 22 जूनपासून नियोजित महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आता 3 ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे. तशी तयारी सुद्धा सरकारने सुरू केली आहे. महत्वाचे ठराव, निर्णय अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन दोन ते तीन दिवसच असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच सर्व नियमांचे पालन, सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा यासाठी सरकार नियोजन करत असल्याची माहिती आहे.
दरम्यानच्या काळात पुरवणी मागण्यासांठी आवश्यकता भासल्यास 3 ऑगस्टपूर्वी एक दिवसाचे विशेष अधिवेशनाची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून यासंदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल असेही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात सर्वसामान्य नागरिक, पोलीस, सेलिब्रेटी डॉक्टर, नगरसेवक, आमदार, खासदारांनाही करोना झाल्याचे समोर आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव हा मुंबईत काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, आता या करोनाने इतर भागात फैलाव करण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे.