आणखी 33 मृत्यूंची नोंद
पुणे – शहरात करोनामुळे बाधित आणि मृतांचे प्रमाण वाढतेच आहे. पण, दुसऱ्या बाजूला शहरात करोनामुक्तांचे प्रमाणही लक्षणीय असल्याचे समोर येत आहे. बुधवारी दिवसभरात आजपर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 883 जण करोनामुक्त झाले आहेत. तर,1,751 नवे करोनाबाधित सापडले आहेत. बाधितांची एकूण संख्या 42,466 झाली आहे.
शहरात बुधवारी दिवसभरात 33 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून, ही संख्या गेल्या दोन दिवसांतील आहे. आज दिवसभरात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आठ दिवसांपूर्वी साडेचारशे ते पाचशेच्या आसपास असलेली अत्यवस्थ बाधितांची संख्या आता 609 पर्यंत गेली आहे. त्यामध्ये 95 बाधित व्हेंटिलेटरवर आहेत. 515 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या सध्या 16 हजार 269 आहे. बुधवारी नमुने तपासणीच्या संख्येने साडेसात हजारांचा टप्पा गाठला आहे. दिवसभरात 7 हजार 595 संशयितांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, शहरात आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 25,129 झाली आहे.
हवेलीत आणखी 113 करोनाबाधित
हवेली तालुक्यात बुधवारी दिवसभरात करोनाचे 113 बाधित आढळले आहेत. दिवसभरात 35 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी देहू-13, खडकवासला-6, किरकिटवाडी-3, कोंढवे धावडे-2, लोणी काळभोर-11, मांजरी बु.-15, मांजरी खुर्द-15 नांदेड- 6, नऱ्हे 10, भिलारेवाडी-2, शेवाळवाडी-3, वडकी-3, वाघोली-10, कदमवाकवस्ती-10, उरुळीकांचन-10, गुजर-निंबाळकरवाडी येथे 5 या प्रमाणे करोनाबाधित आढळले.