किशोर आप्पासो मासाळ
प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आतापर्यंत विरोधकांनाही त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरून काम करण्याची संधी दिली आहे. यातील एक उदाहरण म्हणजे बारामतीचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ. अवघ्या अडीच वर्षांत मासाळ यांनी राज्यात युवकांचे प्रश्न सोडविले आहेत. तसेच निरीक्षक पदाची दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. या कालावधीत मासाळ यांचा अजितदादा यांच्याशी संपर्क आला. किशोर मासाळ यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नेतृत्वगुणाला दिलेला उजाळा…
2012 मध्ये बारामती पंचायत समिती निवडणूक, 2013 मधील बारामती नगर परिषद पोटनिवडणूक, 2016 मधील नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक मासाळ यांनी लढविली होती. यापूर्वी मी युवकांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडविणे, संघटन बांधणी आदींवर काम केले होते.
या निवडणुकांमध्ये अवघ्या 25 मतांच्या फरकाने माझा पराभव झाला होता. चार वर्षांत समाजातील तळागाळातील विविध घटकांचे प्रश्न सोडविताना सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी नाळ कायम ठेवली. यादरम्यान, डिसेंबर 2017 मध्ये ज्येष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर यांनी अजितदादांशी माझी भेट करून दिली. मी विरोधक असतानाही त्यांनी कोणताही आकस न ठेवता राष्ट्रवादीत प्रवेश देऊन काम करण्याची संधी दिली. 21 मार्च 2018 मध्ये अजितदादांनी मला राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली.
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यावेळी मला अटक झाल्यानंतर दादांनी धीर देत वकिलांची सोय केली. त्यावेळी एक महिना कारावास झाला होता. या कालावधीत माझ्या कुटुंबाची आस्थेवाईकपणे विचारपूस करून दादांनी आधार दिला. राष्ट्रवादीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना
दादांनी कधी वाऱ्यावर सोडले नाही. त्यांनी लढवय्ये मावळे निर्माण केले. राष्ट्रवादीच्या संघटन बांधणीत युवक, कार्यकर्ते हीच शिदोरी आहे.
अजितदादा यांची कार्यतत्परता सर्वसामान्यांना सुखावणारी आहे. कोणतेही काम घेऊन आलेला कार्यकर्ता आणि जनतेशी थेट संपर्क साधणारे नेते राज्यात विरळच आहेत. दादा यापैकी एक. आठवड्यातील दादांचा मतदारसंघातील दौरा कधी चुकला नाही. त्यांची सकाळी सहापासून कामास सुरुवात होते. त्यावेळी अधिकारी, स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासमवेत ते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ देतात. दोन दिवसांत मतदारसंघातील कामांचा निपटारा करतात. दादांकडे इतकी कार्यतत्परता आहे की, प्रत्येक घटक यातून समाधानी होऊन जातो.
राज्यातील राष्ट्रवादीची फळी भक्कम करीत असताना दादांनी मतदारसंघाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांनी प्रत्येक जिल्हा, तालुका, गावपातळीपर्यंत नेटवर्क मजबूत केले आहे. एकदा कार्यकर्त्याला संधी दिली की, ते त्यांच्याकडून काम करून घेतात. तसेच काम मार्गी लावण्यासाठी कधी विलंब करीत नाहीत. 2018मध्ये कर्जत- जामखेड मतदारसंघात माझी निरीक्षकपदी निवड केली. त्या मतदारसंघातील समस्या जाणून घेतल्या. तिथे काम करण्यासाठी माझ्यावर विश्वास टाकला.
समाजातील कोणाताही प्रश्न सोडविण्यात दादांचा हातखंडा आहे. आपण कोठेही कमी पडणार नाही, याची ते नेहमी दक्षता घेतात. प्रसंगी कठोर, कधी हळवे, भावनिकही होतात. याची प्रचिती नुकतीच एक महिन्यापूर्वी आली. एका गरीब कुटुंबातील पदवीवर मुलगी दादांना भेटायला आली. दोन दिवसांपासून ती उपाशी होती. पदवी असूनही तिला नोकरी मिळत नाही. ही व्यथा तिने मांडली.
दादांनी या मुलीची हलाखीची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत या मुलीला नोकरी दिली. ही कार्यतत्परता दादांच्या ठायी भरली आहे. त्या मुलीने दादांचे आभार मानले. यापूर्वी मी नोकरी देण्यात कमी पडलो, ही खंत दादांनी त्यावेळी बोलून दाखविली.
दादांनी आपल्या मतदारसंघातील घराघरांत लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे ते विक्रमी मतांनी निवडून येतात. आजही अजितदादा हे आपल्या घरचा उमेदवार आहे, यासाठी प्रत्येक मतदार नेहमीच दक्ष असतो. ते फक्त दादांच्या निस्मीम आपलुकी आणि प्रेमापोटीच.
दादांना समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्राची प्रगती करण्यासाठी प्रचंड ऊर्जा मिळो. माझ्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून तसेच हितचिंतकांकडून दादांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.
शब्दाकंन : प्रमोद ठोंबरे (बारामती)