लोणी काळभोर -एका व्यावसायिकाला 25 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दुकान बंद करण्याची धमकी देऊन दोन ग्राहकांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विशाल सुभाष मोहेकर (वय 41, रा. रेव्हेन्यू कॉलनी, जेएम रोड शिवाजीनगर, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली. विशाल व त्यांचे भाऊ सागर मोहेकर यांचे कोरेगाव मूळ (ता. हवेली) हद्दीत सोलापूर महामार्गालगत शेवंता कॉम्प्लेक्स येथे जेनिथ वाईन्स नावाचे किरकोळ देशी-विदेशी दारू विक्रीचे दुकान आहे. 10 जुुुलै रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे सकाळी 10 च्या सुमारास दुुुकान उघडले.
दुपारी सव्वादोनच्या सुमारास 20 ते 25 वर्षे वयाचा अंगाने मध्यम, तोंडाला रूमाल बांधलेला तरुण त्यांचे जवळ आला व गोरख कानकाटे यांच्या ऑफिसमधून फोन आहे असे म्हणून त्याने विशाल मोहेकर यांचेकडे मोबाईल दिला. त्यावेळी समोरून मी गोरख कानकाटे यांच्या ऑफिसमधून बोलतोय, तुम्ही धंदा सुरू केला आहे. ऑफिसला येऊन भेटायचे, असे सांगण्यात आले. मोहेकर यांनी त्यास नकार दिला. त्यास नाव विचारले असता त्याने मंगेश कानकाटे असे सांगितले व फोन बंद केला.
11 जुलै रोजी सकाळी 11 च्या सुमारास मोहेकर बंधू दुकानांत येणासाठी निघाले. त्यावेळी त्यांना दुकानातील मारुती कोळेकर यांचा फोन आला. तो म्हणाला, तोंडाला रूमाल बांधून पाच ते सहा मुले आली होती. त्याचे हातात लाकडी दांडकी, लोखंडी रॉड व कुऱ्हाड होती. दुकान बंद करा, शटर खाली घ्या असे म्हणून त्यांनी दुकानासमोरील दोन गिऱ्हाईकांना मारहाण केली. त्यावेळी सोलापूर रस्त्याने पोलीस गाडी गेल्यामुळे ते सर्वपळून गेले.
धंदा करायचा असेल तर…
दुकानात आलेल्या तरुणाने उद्या सकाळी 25 लाख रुपये कानकाटे यांचे ऑफिसला घेऊन यायचे. या भागात धंदा करायचा असेल, तर तुम्हाला मंगेश कानकाटे याला पैसे द्यावेच लागतील. नाही दिले तर तुम्हाला ठार मारीन, अशी धमकी दिली.