नवी दिल्ली – करोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. यातून बाहेर पाडण्यासाठी करोना प्रतिबंधक लस शोधण्यासाठी दिग्गज कंपन्या प्रयत्न करत आहेत. अशातच एका दिलासादायक बातमी समोर येत आहे. अमेरिकेतील मॉडर्ना औषध कंपनीने करोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात आली असून खूप चांगले निकाल समोर आले आहेत. या लसीने प्रत्येक व्यक्तीमध्ये करोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार केली आहेत. सोबतच याचे कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. त्यांचे वय 18 ते 55 दरम्यान होते.
या चाचणी दरम्यान वृद्धांवरही लसची चाचणी घेण्यात आली असून त्यांचे निकाल अद्याप कळलेले नाहीत. औषध निर्माता मॉडर्ना आता करोना विषाणूच्या लसीच्या लेट स्टेज ट्रायलची तयारी करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार 27 जुलैच्या सुमारास ट्रायलला सुरुवात होईल. या लसीचा हा टप्पाही यशस्वी ठरला तर कंपनी लस बनवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करु शकते. आरएनए आधारित लसीची मानवी चाचणी घेणारी मॉडर्ना ही पहिलीच औषध कंपनी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही वर्षअखेरीस करोनाची लस येईल, असं म्हटलं होतं.
दरम्यान, भारतात करोना लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. भारत बायोटेक या कंपनीने ही घोषणा केली. झॅडस कॅडिला या कंपनीलाही लस चाचणीसाठी केंद्राची परवानगी मिळाली आहे. देशात सध्या दोन कंपन्याकडून करोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.