नगर – वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या तपोवन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अलिकडेच मंजूर झाले. तब्बल 3.5 कोटींचा निधी या रस्त्यासाठी वर्ग झाला. मात्र, सत्ताधारी, अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केला. त्यातून जनतेच्याच पैशांची लूट झाली आहे, असा गंभीर आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आज केला.
तपोवन रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप अलिकडेच शिवसेनतर्फेही करण्यात आला होता. त्यानुसार आज गुणवत्ता पथकाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यास सुरूवात केली आहे. उपनेते राठोड यांनी सत्ताधारी, अधिकारी व ठेकेदाराविषयी गाऱ्हाणे मांडले.
अधीक्षक अभियंता अभय पेशवे, माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, दिगंबर ढवण, गिरीश जाधव, उपशहर प्रमुख डॉ. चंद्रकांत बारस्कर, अशोक कातोरे, विक्रम राठोड, अनिकेत कराळे, आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
राठोड म्हणाले, “”जोपर्यंत रस्ता पूर्ण उखडून पुन्हा पहिल्यापासून होत नाही. तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही. भविष्यात अनेकदा आंदोलन करण्यात येईल. तसेच रस्ता चौकशीतून ज्यांचे-ज्यांचे हात या कामातील भ्रष्टाचारात बरबटले आहेत. त्यांच्याच माथी हे पाप आम्ही टाकणार आहोत.” ठिकठिकाणी रस्ता खोदून त्यात वापरण्यात आलेल्या मटेरियलची तपासणी अधिकारी करत आहेत.
रत्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेला. रस्त्याचे डांबर हाताने निघत आहे, आदी मुद्यांवर कळमकर, ढवण यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.