ग्रामीण भागासाठी अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबदाऱ्या
पुणे – ग्रामीण भागामध्ये करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून यासंदर्भातील प्लॅननुसार सदर अधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
कंन्टेन्मेंट झोनवर लक्ष…
ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्र नियोजनाकरिता उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे ग्रामीण भागात करोना संसर्गाचे संशयित रुग्ण आढळत आहेत, अशा ठिकाणी करोना प्रतिबंधक उपाययोजनेच्या संदर्भात नियंत्रण आराखडा (कंन्टेन्मेंट झोन) तयार करणे, असे कंटेन्मेंट झोन तयार करीत असताना शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कंन्टेन्मेंट झोन तयार केले आहेत काय याची तपासणी करण्याची जबाबदारी आहे.
बाधित व्यक्तींचा शोध…
पुणे जिल्ह्यातील छावणी परिषदेकरीता झोपडपट्टी पुनर्वसनचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेश जाधव यांच्याकडे छावणी परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये संशयित करोना रुग्णांची तात्काळ कोविड तपासणी करणे. ज्या भागामध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशा भागामध्ये कंन्टेन्मेंट झोन तयार करणे. करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती हायरिस्क आणि लो रिस्कमधील किमान 10-12 व्यक्त्तींचा शोध घेण्याची जबाबदारी आहे. उपजिल्हाधिकारी आरती भोसले यांच्याकडेही अशीच जबाबदारी असणार आहे.
बेड तातडीने उपलब्ध होणार…
ग्रामीण भागात हॉस्पिटलमधील बेडच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्याकरिता पुनर्वसन शाखेचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे व उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या बेडची माहिती प्राप्त करुन घेणे. या रुग्णांना ज्या रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध आहेत त्या रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्याबाबत कोविड टेस्टींग नोडल अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या समन्वयाने नियोजन करण्याची जबाबदारी आहे.
तपासणी तातडीने होणार…
रोजगार हमी शाखेचे उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद क्षेत्रामध्ये करोना संसर्गाचे संशयित रुग्ण आढळत आहेत, अशा रुग्णाचा करोना विषाणू तपासणी अहवाल संबंधित लॅबकडून 24 तासांत प्राप्त होईल, याबाबत नियोजन करण्याची जबाबदारी आहे.