शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे दोन दिवसांपूर्वी एका कंपनी कामगाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आता असताना त्या कामगाराच्या संपर्कातील अकरा व्यक्तींचे स्व्याब तपासणीसाठी घेतलेले असताना अकरा जणांपैकी एकाच कुटुंबातील सहा जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून इतर पाच व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या आणि शिक्रापूर येथीलच एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीला असणाऱ्या कामगाराला सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने त्याने शिक्रापूर येथील दोन हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले असता डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याची कोरोना तपासणी केल्यानंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने सदर रुग्णाच्या संपर्कात असलेल्या त्याच्या आई, पत्नी, भाऊ, भावाची पत्नी यांच्यासह एकूण अकरा व्यक्तींचे स्व्याब तपासणीसाठी घेत खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या, सदर परिसरात वारंवार कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने परिसरात नियमित फवारणी करून घेण्यात येत आहे.
आज आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतलेल्या अकरा व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून अकरा पैकी सहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. मात्र, कोरोना बाधित असलेल्या सहा व्यक्तींमध्ये एका तीन वर्षीय बालकाचा देखील समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सदर रुग्ण काम करत असलेल्या कंपनी, रुग्ण दाखल असलेले हॉस्पिटल तसेच त्याच्या घराजवळील परिसरात किती लोक त्याच्या सानिध्यात आले याची चौकशी सुरु असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तातडीने क्वारंटाईन करून पुढील कार्यवाडी करण्यात येणार आहे. मात्र काही दिवस कोरोना पासून मुक्ती मिळाल्याने शिक्रापूर व परिसरातील नागरिक समाधानी असताना आता पुन्हा एकामागून एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शिक्रापूर सह परिसर हादरून गेला आहे.
नागरिकांनी घाबरून जास्तीत जास्त काळजी घ्यावी : डॉ. प्रज्ञा घोरपडे
शिक्रापूर सह परिसरातील अनेक गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी घाबरून न जाता, मास्कचा वापर करावा, विनाकारण बाहेर पडू नये, गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, काही संशयित लक्षणे आढळून आल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावा असे आवाहन तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी केले आहे.