अफगाणिस्तानातील दोन ठिकाणच्या हल्ल्यात सहा पोलीस ठार

काबूल: अफगाणिस्तानातल्या कंदहार प्रांतात आज तेथील जिल्हा पोलीस मुख्यालयावर तालिबानी गनिमांनी हल्ला केला. त्यात तीन पोलीस अधिकारी ठार झाले. स्फोटके असलेल ट्रक मुख्यालयावर घुसवून हा हल्ला करण्यात आला. दुसऱ्या एका घटनेत पूर्व गझनी प्रांतात रस्त्याच्याकडेला पेरून ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला. त्यातही तीन पोलीस जवान ठार झाले आहेत.

या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी तालिबान्यांनी स्वीकारली आहे. पहिली हल्ल्याची घटना शाह वाली कोट येथे घडली. आत्मघाती पथकातील गनिमाने स्फोटकांसह जिल्हा पोलीस मुख्यालयात ट्रक घुसवून हा हल्ला केला.

त्यात तीन अधिकारी ठार आणि अन्य चौदा जण जखमी झाले आहेत. हा ट्रक संशयास्पद वाटल्याने तो मुख्यालयाच्या मुख्य इमारतीत घुसण्याच्या आधीच तेथे तैनात असलेल्या गार्डांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यातून ट्रकमधील स्फोटकांचाही स्फोट झाला. स्फोट अतिशय तीव्रतेचा होता त्यामुळे आजूबाजूच्या अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

गझनीतील दुसऱ्या स्फोटात दायक जिल्ह्याचा पोलीसप्रमुख
आणि त्याचे दोन बॉडीगार्ड असे तीन जण ठार झाले. खोगयानी येथेही मंगळवारी तालिबान्यांनी लष्कराच्या चेकपोस्टवर हल्ला केला, पण तेथील सैनिकांनी हा हल्ला प्रतिगोळीबार करून परतवून लावला. त्यात 20 तालिबानी गनिम ठार झाल्याचे सांगण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.