मुंबई – कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. त्यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू केल्या गेल्या नाही. यादरम्यान, लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून होते.
मात्र, आता हळूहळू सर्व अनलॉक करताना दिसत आहेत. तसेच राज्य सरकारने चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी दिली आहे. पण त्यासाठी काही नियम आखण्यात आले आहेत.
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘अग्गंबाई सासूबाई’ ही १३ जुलैपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा ऑफिशल प्रोमो शेअर करण्यात आला असून, काही तासांतच प्रोमोला प्रचंड लाईक्स मिळाले आहेत.
यावेळी सासूबाई मात्र काहीशा वेगळ्या रुपात दिसणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश गोष्टी बदलत असताना या साध्याभोळ्या सासूबाईंचा अंदाजही बदलला आहे. त्यामुळे या व्हिडिओ ला, “सासू झाली आई… आता बबड्याची खैर नाही” अशी दमदार टॅग लाईन देण्यात आली आहे.