भात पीक शेतीशाळेत केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पुणे – हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन व कृषी संजिवनी सप्ताहाचे औचित्य साधून कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी मावळ तालुक्यातील जांभूळ येथील क्रॉपसॅप अंतर्गत भात पीक शेतीशाळेत शेतकऱ्यांशी बाधांवर जाऊन संवाद साधला.
करोना संकट काळातही शेतकऱ्यांनी ग्राहकांना थेट फळे व भाजीपाला घरपोच पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपल्या गावात शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचा भाजीपाला उत्पादित करून विपणन व्यवस्था निर्माण करून आर्थिक स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन कृषी आयुक्त दिवसे यांनी यावेळी केले
यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी अन्न धान्याची साठवण तर, विभागीय कृषि सहसंचालक दिलीप झेंडे यांनी उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्नात वाढ करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे शास्रज्ञ सतिश चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल उपविभागीय कृषी अधिकारी सुनील खैरनार, सरपंच गणेश नागेश, मावळ तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, मंडळ कृषी अधिकारी विक्रम कुलकर्णी, कृषी पर्यवेक्षक उत्तम भान, दुर्योधन तुपे, कृषी सहाय्यक शैला जाधव, श्रद्धा कुलकर्णी, प्रियंका पाटील, स्वाती गणवट यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. उत्कृष्ट कार्याबद्दल जांभूळ येथील कृषी सहाय्यक श्रीमती शैला जाधव यांचा विशेष गौरव करण्यात आला. संजय ताकवले यांनी सूत्रसंचालन केले.