शासन नियमावलीत चित्रीकरण होत असल्याचे करणार निरीक्षण
पुणे -करोना पार्श्वभूमीवर ठप्प झालेल्या मनोरंजन विश्वाची घडी पुन्हा एकदा सावरत आहे. तीन महिने स्थगित केलेल्या चित्रीकरणाचा पुन्हा “श्रीगणेशा’ झाला. मात्र, येत्या काळात हे चित्रीकरण शासन नियमावलीत होत असल्याचे निरीक्षण आता भरारी पथक करणार आहे.
अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात नियम आणि अटींसह चित्रीकरणाला शासनाने परवानगी दिली. मात्र, काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. दरम्यान, मागील काही वर्षांपूर्वी बनावट ऑडिशन घेण्यात येत होती, याशिवाय कलाकारांची फसवणूक झाली होती. याला आळा घालण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने स्थापन केलेली पथके पुन्हा सक्रिय होणार आहेत.
चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण करताना सरकारी नियमावलीचे पालन करत आहे की नाही, चित्रीकरणाच्या टीमच्या क्वारंटाइन बाबत उपाययोजना केल्या आहेत का, सेटवर प्रत्येकाची आरोग्य तपासणी होत आहे का, वैद्यकीय पथक आहे का, कोणी आजारी नाही ना चित्रीकरण करताना शारिरीक अंतर ठेवण्यात येत आहे का आदी बाबींची पाहणी भरारी पथक करणार आहे. यासाठी विविध शहरांतील सभासद यामध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच चित्रीकरणाला परवानगी देण्यात येत आहे. आगामी काळात चित्रीकरण करताना काळजी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षाविषयक बाबींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
-मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ