नागपूर – महापालिकेचे आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यात करोनामुळे तीन महिनानंतर झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक हे आयुक्तांविरोधात एकत्र झाल्याने जोरदार गोंधळ उडाला. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट सभात्याग करत काढता पाय घेतला.
सभागृहात पॉईंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्द्यावरुन आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक झाले. हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत असताना भाजप नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तुकाराम मुंढे बोलणं थांबवत नाहीत हे बघून भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आवाज चढवला. जर नगरसेवक आवाज चढवणार असतील तर मी इथे बसणार नाही, असे मुंढे यांनी भर सभेत महापौरांना आणि सभेला सांगितले.
यानंतर तुम्ही सभागृह काय, नागपूर सोडून जा, असे वक्तव्य भाजप नेत्यांनी केल्यानंतर तुकाराम मुंढे नाराज झाले. त्यातच संत तुकारामांच्या नावावरुन तुमचे नाव आहे, त्याला तरी कलंकित करु नका, असे नगरसेवक हरीश ग्वालबांशी यांनी म्हटल्यानंतर तुकाराम मुंढे हे सभागृहातून बाहेर पडले.
…तर कॉंग्रेसच्या प्रस्तावाला पाठिंबा – भाजप
आयुक्तांना घाबरायचे काहीच कारण नाही. आयुक्तांना सभागृहाला सामोरं जायला काय अडचण आहे, हे मला माहित नाही. नागपूर महापालिकेतील नगरसेवक काही गुंड नाहीत. सभागृहात नेहमी चांगली चर्चा झाली आहे. कॉंग्रेस अविश्वास प्रस्ताव आणत असेल आणि नागपूरच्या भल्यासाठी असेल तर त्यांचं 100 टक्के समर्थक करु, असे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले.