शैक्षणिक ई-साहित्य निर्मिती स्पर्धेला अल्प प्रतिसाद

जिल्ह्यातून फक्‍त 218 शिक्षकांचाच सहभाग

पुणे – करोना, लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना घरी बसून ई-साहित्याच्या मदतीने अभ्यास करता यावा, यासाठी त्यांना शैक्षणिक ई-साहित्य उपलब्ध करुन देण्याची गरज भासत आहे. त्यामुळे शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी ई-साहित्य निर्मिती स्पर्धा घेण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेतला. पण, या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून फक्‍त 218 शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे.

इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षण प्रक्रियेस पूरक शैक्षणिक ई-साहित्य निर्मिती व त्याचा वापर करण्यात येणार आहे. शाळेमध्ये शिक्षकांना उपयोगी ठरेल व विद्यार्थी घरी असताना त्यांचा अभ्यास घेण्यासाठी पालकांना सहाय्यभूत ठरेल असे ई-साहित्य निर्मितीसाठी पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ.कमलादेवी आवटे यांनी नियोजन केले. सर्व अधिकाऱ्यांमार्फत पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहचविण्याची कार्यवाही करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

मराठी माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या, शासन मान्यता प्राप्त शाळांमधील मान्यता प्राप्त शिक्षकांसाठी ई-साहित्य निर्मिती स्पर्धा खुली होती. स्पर्धेसाठी ऑनलाइन नावनोंदणी करण्यात आली होती. ई-साहित्याची तालुका व जिल्हास्तरवर छाननी व परीक्षण करण्यात आले. आकर्षक मांडणी, विद्यार्थी कृतीवर भर, मनोरंजकता, संकल्पना, आकलन, सुलभता, तांत्रिक दृष्टया अचूकता या निकषावर गुणदानही करण्याचे निश्‍चित होते.

शासनाने शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी सर्वच शाळांतील शिक्षकांना ई-साहित्य निर्मिती करावीच लागणार आहे. बहुसंख्य शिक्षक त्यात व्यस्तही झाले आहे. मात्र, शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग का घेतला नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.