विनानिविदा यंत्र खरेदी चौकशीची सजग नागरिक मंचची मागणी
पुणे – करोनाच्या नावाखाली विनानिविदा 35 लाख रुपयांची परदेशी बनावटीची धूर फवारणी यंत्रे खरेदी करण्यात आली असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी “सजग नागरिक मंच’च्या विवेक वेलणकर यांनी केली आहे. तसेच या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदनही दिले आहे.
महापालिकेच्या आरोग्य खात्याच्या कीटक प्रतिबंधक विभागासाठी गेल्या वर्षी 48 लाख रुपये खर्च करून 15 धूर फवारणी यंत्रे खरेदी करण्यात आली होती. मुळातच कीटक प्रतिबंधासाठी धूर फवारणीचा फारसा उपयोग होत नसल्याचे “राष्ट्रीय हिवताप निर्मूलन विभागा’ने पूर्वीच निदर्शनास आणून दिले आहे. त्यानुसार महापालिकेने हा धूर फवारणी उपक्रम मर्यादित केला होता, असे असतानाही गेल्या वर्षी तब्बल 48 लाख रुपये खर्च करून ही 15 यंत्रे का घेण्यात आली, असे वेलणकर यांचे म्हणणे आहे.
करोनावर धूर फवारणी उपयुक्त ठरत नसताना पुणे पालिकेने केलेली खरेदी संशोधनाचा विषय असल्याचे वेलणकर म्हणाले. या यंत्रांमधून धूर फवारणी ऐवजी औषध फवारणी केली जाणार, असे गृहीत धरले तरी हे यंत्र अवजड असल्याने केवळ आऊटडोअरच फवारणी करता येणे शक्य आहे. ज्यावर आपण आधीच बंदी घातली आहे.
मशीन्स “मेड इन कोरिया’…
व्हेंटिलेटर्स, पीपीई किट यासारख्या अत्यावश्यक खरेदीसाठी आता निधी कमी पडत आहे. पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेची हाक दिल्यानंतर ही “मेड इन कोरिया’ असलेली मशीन्स घेणे चुकीचे आहे. पालिका वनाझ कंपनीची हातात धरून धूर फवारणी यंत्रे अनेक वर्षांपासून वापरत आहे याकडे वेलणकर यांनी लक्ष वेधले.