बेलग्रेड – करोनाच्या धोक्यामुळे आगामी काळात प्रत्येक स्पर्धा खेळताना अनेक प्रकारच्या निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. यामुळे निराश झालेल्या नोवाक जोकोविचने यंदाच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
जागतिक टेनिस क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला हा सर्बियाचा अव्वल टेनिसपटू फ्रेंच ओपन स्पर्धेसाठी अमेरिकन स्पर्धेतून अंग काढून घेण्याच्या तयारीत आहे. ही स्पर्धा येत्या 31 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील मानाची विम्बल्डन स्पर्धा रद्द झाली आहे. त्यामुळे आता ग्रॅण्डस्लॅममधील अमेरिकन, फ्रेंच व ऑस्ट्रेलियन अशा तीन स्पर्धा बाकी आहेत.
या स्पर्धांमध्ये सहभागी होताना आम्हाला आमच्याबरोबर आणखी एकच व्यक्ती ठेवावी लागणार आहे. तसेच प्रत्येक आठवड्यात दोन वेळा करोना चाचणी करावी लागणार आहे. एक खेळाडू म्हणून मला हे शक्य नाही, असे मला वाटत असल्याचे जोकोविचने सांगितले.