पिरंगुट- भूगाव (ता. मुळशी) येथील माताळवाडी फाटा येथे राहणाऱ्या एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे. या व्यक्तीचा बुधवारी (दि. 10) रात्री करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही व्यक्ती राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भूगाव येथील माताळवाडीमध्ये ही व्यक्ती राहायला आहे. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात राहायला असून त्याला करोनाची बाधा झाली होती. त्याच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीला त्रास होऊ लागला, त्यामुळे त्याची करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीला उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या घरातील तीन व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले असून त्यांचे अहवाल पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे.
दरम्यान ही माहिती मिळताच गटविकास अधिकारी संदीप जठार, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सरपंच निकिता सणस, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार आदींनी भेट देऊन पाहणी केली, तसेच संपूर्ण सोसायटीमध्ये ग्रामपंचायत भूगावच्या वतीने तात्काळ करोना प्रतिबंधक निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आणि पत्रे आणि बांबूच्या साहाय्याने संपूर्ण इमारत सिल करण्यात आली आहे. कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा,तसेच सोशल डिस्टंन्सिगचे नियम पाळावेत. नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कारंजकर आणि सरपंच निकिता सणस यांनी केले आहे.