स्वत:चे नियम न बनविण्याची तंबी
पुणे – करोनाचे रुग्ण उपचारानंतर घरी आल्यानंतर त्यांच्यावर, त्यांचे नातेवाईक, केअरटेकर यांच्यावर बहिष्कार टाकू नये, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना दिले आहेत. सोसायटीने स्वत:ची वैयक्तिक बंधने न लादता राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधितांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.
काही गृहनिर्माण सोसायट्यांकडून करोना बाधित आणि त्यांच्या नातेवाईकांबाबत स्वत:चे वेगळे नियम तयार करून सोसायटीमध्ये बंधने घातल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर सोसायटीमधील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने वागणूक देण्यात येत नव्हती. काही सोसायट्यांमध्ये या व्यक्तींना ये-जा करण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांना बाहेर कुठेतरी राहण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत.
गृह सोसायट्यांना आदेश
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामावर जाणे- येण्यासाठी प्रतिबंध करू नये. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, गॅस व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, संस्थावर ये-जा करण्यास आडवू नये. मास्क लावणे, निर्जंतुकीकरण, सॅनिटाझरचा वापर, साबणाने हात धुणे, वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुलांची काळजी घेणे, सामाजिक अंतर राखणे, अनावश्यक गर्दी टाळणे आदी बाबींवर जनजागृती करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट करून नवे नियम करू नयेत, असे म्हटले आहे.