नवी दिल्ली : लॉकडाउननंतर पहिल्यांदाच तिरुमला तिरुपती देवस्थान उघडण्यात आले. मंदिर सोमवारपासून तीन दिवस ‘ट्रायल’ म्हणून उघडण्यात आले होते. यादरम्यान व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय करता येईल याची पाहणी केल्यानंतर 11 जूनला म्हणजे आजपासून मंदिर भक्तांसाठी उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान कोरोनाच्या संकटामुळे 20 मार्चपासून बंद होते. सोमवारी हे मंदिर पहिल्यांदा उघडले आणि पहिल्याच दिवशी भाविकांनी तब्बल 25 लाख 70 हजार रुपये दान केले. पहिले दोन दिवस फक्त टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी मंदिर उघडण्यात आले होते. तर, तिसऱ्या दिवशी मंदिर स्थानिकांसाठी उघडण्यात आले होते.
पहिले दोन दिवस मंदिरात जवळपास 12 हजार भक्तांनी दर्शन घेतले. ते सर्व टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच 11 तारखेच्या दर्शनाचे तिकीटे काही तासांमध्येच संपल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 20 मार्चपासून भाविकांसाठी बंद असलेल्या तिरुपती मंदिरात सामान्यपणे दर महिन्याला रोख आणि हुंडीद्वारे सुमारे 200 कोटी रुपयांचे दान मिळत असते.