करोना जनजागृतीसाठी पालिकेचे कम्युनिटी रेडिओ स्टेशन
पुणे – शहरातील नागरिकांमध्ये करोना विषय जनजागृतीसाठी आता पुणे महापालिकाही कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करणार आहे. पुणे विद्यापीठाचे “विद्यावाणी’ हे रेडिओ स्टेशन महापालिकडून पुढील काही महिने भाडेतत्त्वार घेण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच महापालिका आणि पुणे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त बैठक झाली. त्यानुसार, पुढील काही दिवसांत हे रेडिओ स्टेशन सुरू केले जाणार आहे.
शहरात करोनाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे पालिकेकडून करोनाबाधितांची घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊन काळात शहरात डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर नागरिकांकडून वाढला असून त्यात रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या 20 ते 25 टक्के वाढली आहे. त्यामुळे आधी पालिकेकडून शहरातील काही खासगी एफएम वाहिन्यांशी संपर्क साधला होता. मात्र, त्यांचे खर्चाचे आकडे कोटींच्या घरात जातात. त्यामुळे पुणे विद्यापीठाकडे याबाबत विचारणा केली. त्यांच्याकडून “विद्यावाणी’ हे कम्युनिटी रेडिओ स्टेशन चालविले जाते. जवळपास संपूर्ण शहरात ते ऐकता येते.
तसेच, हे स्टेशन विद्यापीठ तसेच महाविद्यालये बंद असल्याने सध्या बंद आहे. त्यामुळे महापालिकेकडून हे स्टेशन जनजागृतीसाठी वापरले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
जनजागृतीचे कार्यक्रम होणार
या स्टेशनवर संपूर्ण दिवसभर वेगवेगळे जनजागृतीचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात करोनाविषयक जनजागृती, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे तसेच त्यांच्या शंकाचे समाधान करण्यासाठी थेट संवादाचे कार्यक्रम, तज्ज्ञ-डॉक्टरांच्या मुलाखती, प्रशासकीय यंत्रणेचे सुरू असलेले कामकाज, नागरिकांच्या मुलाखती अशा कार्यक्रमांचे प्रसारण होणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती वाढल्यास नागरिकांकडून आरोग्य यंत्रणेस सहकार्य केले जाईल. या उद्देशाने हे रेडिओ केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे.