वॉशिंग्टन: चीनमधील वुहान प्रांतातल्या हॉस्पिटलमध्ये अचानक रुग्णांची गर्दी व्हायला लागली होती. रुग्णांची ही अचानक वाढलेली गर्दी उपग्रहांनी बरोबर हेरली होती. त्यामुळे करोनाचा संसर्ग मध्य चीन आणि विशेषतः वुहान प्रांतात खूप पूर्वीपासूनच झाला होता, असे धक्कादायक वृत्त एका इंग्रजी संकेतस्थळाने दिले आहे.
हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधकांच्या पथकाने एखाद्या गुप्तहेर संस्थेतील तंत्रज्ञानाच्या आधारे ही बाब उजेडात आणली आहे. वुहानमधील प्रमुख 5 हॉस्पिटलमध्ये गेल्या उन्हाळ्यापासून आणि 2019 च्या सुरुवातीपासूनच रुग्णांची रीघ लागायला लागली होती. त्यामुळे तेथे करोनाचा संसर्ग पूर्वीच झाला असावा असा निष्कर्ष हॉर्वर्ड मेडिकल प्रोफेसर जॉन ब्राऊन्स्टेन यांनी काढला आहे.
रुग्णालयांमधील रुग्णांच्या वाढत्या गर्दीबरोबरच चीनमधील नागरिकांकडून अचानक वाढलेल्या आजारपणाबद्दल इंटरनेटवरून बरीच माहिती शोधायला सुरुवात केली होती. त्यामध्ये करोनाशी साधर्म्य असलेल्या लक्षणांच्या आधारे रोगाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न झाला होता, असेही ब्राऊन्स्टेन यांनी म्हटले आहे.
या संदर्भात उपग्रहाकडून प्राप्त झालेल्या सुमारे 350 छायाचित्रांचा हवालाही ब्राऊन्स्टेन यांनी दिला आहे. हॉस्पिटलच्या आवारात कार पार्क करायलाही जागा नसायची. रुग्ण सातत्याने हॉस्पिटलच्या दिशेने चाललेले असायचे आणि हॉस्पिटलच्या स्टाफकडून सारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना एकत्रच उपचार करायला सुरुवात केली होती.
10 ऑक्टोबर 2018 रोजी वुहानमधील सर्वात मोठ्या तियानवु हॉस्पिटलच्या परिसरात 171 कार पार्क होत्या. वर्षभराने याच हॉस्पिटलबाहेर 267 म्हणजे 67 टक्के जास्त कारची गर्दी होती. आणखी एका हॉस्पिटलच्या बाहेरील कारची गर्दी 2018 च्या तुलनेत सप्टेंबर 2019 मध्ये एकदम 90 टक्क्यांनी वाढलेली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करण्याचे करोनाशिवाय आणखी काय कारण असू शकते.