पुणे : राज्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत देता यावी यासाठी नुकसानीचे पंचनामे तातडीने करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. पुण्यासह राज्यातील सर्व बधितांना जास्तीत जास्त मदत केली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना ऐकून घेतल्या व मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करणे, वीजेचे खांब उभे करणे, गरज भासल्यास दुसऱ्या जिल्ह्यातील मनुष्यबळाची मदत घेणे, आदिवासी-बिगर आदिवासी भागातील लोकांना तातडीने मदत देणे, घर, शाळा, अंगणवाडी दुरूस्तीची कामे तातडीने सुरू करणे, नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून अहवाल सादर करणे आदी सूचना त्यांनी केल्या. १३ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.