राजगुरूनगर – खरपुडी (ता. खेड) येथील एका ओढ्यात जवळपास 200 ते 250 आधारकार्डसह पोस्टातून वितरित केली जाणारी महत्त्वाची कागदपत्रे गोणीत भरून फेकून दिली होती. ते या भागात सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोस्ट खात्याचा भोंगळ कारभार यामुळे चव्हाट्यावर आला आहे.
आधारकार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ओळखपत्र आहे. यूनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच यूआयडीआय हे 12 अंकी कार्ड जारी करते. हे एक डिजिटल आयडी प्रूफ आहे, याच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ मिळवू शकतो. खरपुडी खंडोबा गावाकडे जाणाऱ्या काळे वस्ती येथील वनविभागाच्या नर्सरी समोरील ओढ्यात 200 ते 250 आधारकार्ड सापडली आहेत. तसेच एलआयसीच्या नोटिसा, इतर महत्त्वाची पोस्टाने येणारे कागदपत्रे, इतर सरकारी पोस्टाने येणाऱ्या नोटिसा गोणीत भरून ओढ्यात अज्ञात व्यक्तीने टाकल्या होत्या. या गोणी गेल्या कित्येक दिवसापांसूपन या ओढ्यात पडून होत्या.
काही दिवसांपूर्वी खरपुडी परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने पोष्टाने आलेली ही महत्त्वाचे कागदपत्रे गोणीत टाकून फेकून दिल्याने ती खराब झाली आहेत. फेकून देण्यात आलेली आधार कार्ड वाकी, संतोष नगर, भाम येथील असल्याचे खरपुडीचे माजी सरपंच मोतीराम काळे, प्रंशात गाडे यांनी सांगितले.
दरम्यान, ओढ्यातील घटनीची कुणकुण पोस्टमनला लागताच शनिवारी (दि. 30) सकाळी ही आधार कार्ड, व इतर नोटिसा पोस्टमन ओढ्यातून गोळा करून घेऊन गेला असल्याचे समजते.
छपाई सहा वर्षांपूर्वीची
या आधारकार्डाची छपाई 6 वर्षांपूर्वी करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. मात्र पोस्टातील कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी वितरण न केल्याने ही आधारकार्ड नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी ही आधारकार्ड पिशवीत भरून ओढ्यात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत ही आधार कार्ड का टाकण्यात आली, आधार कार्ड बनावट आहे काय? कोणत्या कारणास्तव ती फेकून देण्यात आली त्याचा गैरवापर झाला आहे का? बनावट कामासाठी वापरली का हा संशोधनचा विषय बनला आहे,