राजगुरूनगर (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल सव्वादोन महिन्यांपासून बंद असलेला चाकण येथील जनावरांचा बाजार शनिवारी (दि. 30) सुरू झाला आहे. त्यामुळे येथील जनावरांच्या बाजारात जर्शी गायी, बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. दिवसभरात एकूण उलाढाल 1 कोटी रुपये झाली.
चाकण येथील जनावरांचा बाजार सुरू झाल्याने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकरिता ही समाधानकारक बाब आहे. चाकण येथील महात्मा फुले मार्केटच्या आवारात महिन्यातील प्रत्येक शनिवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो. विविध भागातून शेतकरी जनावरे घेऊन व काही जण जनावरे खरेदी करण्याकरिता आले होते. शेतकरी व व्यापारी यांच्या मागणीनुसार, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी पणन विभागाकडे पशुधनाची खरेदी विक्री सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार चाकण येथे जनावरांचा बाजार सुरू करण्यात आला.
जनावरांचा बाजार भरत असलेल्या ठिकाणी गर्दी टाळून आणि फिजिकल डिस्टन्स ठेवून हा बाजार भरविण्यात आला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण व राजगुरूनगर उपबाजार आवारात काही दिवसांचा अपवाद वगळता लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, तरकारी व बंद असलेले कांदा व बटाटा हे व्यापार सुरू ठेवण्यात आले होते.
करोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समिती अलर्ट झाली आहे. मार्केटयार्डमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती हातावर सॅनिटायझर टाकले जात आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच ज्यांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधला आहे त्यांनाच मार्केट यार्डमध्ये प्रवेश देण्यात आला. तापमापक यंत्राच्या माध्यामातून प्रत्येकाची तपासणी केली जात आहे, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.