कोपरगाव -करोनामुळे जगासह देश ठप्प झाला आहे. या महामारीवर लस शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र त्यात अद्याप यश आलेले नाही. मात्र अश्वमेध मेडिकेयर प्रा. लि.ने कफेक्स व प्रोटेक नावाची औषधे तयार केली असून, ही औषधे करोनावर रामबाणण उपाय ठरतील, असा दावा डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
डॉ. वाघचौरे म्हणाले, करोनावर लस लवकरच येईल, हा आशावाद आता फोल ठरत आहे. त्यामुळे या आजाराबरोबर राहायला शिका व बदलांना सामोरे जा, असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. चीनने पारंपरिक औषधांवर भर देऊन लोकांची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मोठे मिशन हाती घेतले. तसेच उद्योगधंदे सुरू केले. भारतीय आयुर्वेदातही महाज्वरासाठी उपाय योजना सुचविल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आयुर्वेदामध्ये चिकित्सेनुसार उपचार संगितले आहेत. तसेच आयुर्वेदिक उत्पादन वाढीसाठी सरकार चालना देत आहे. पण अधिकारी त्यास प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे जुलैनंतर देशातील स्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती आहे.
करोनाचा पहिला बळी भारतात गेला. तेव्हापासून आपण जी औषधे तयार केली आहेत ती मोफत चाचणीसाठी पुरवून देखील प्रशासनाकडून त्याची दखल घेतली गेलेली नाही. प्रशासनातील काही डॉक्टरांनी या औषधांची माहिती घेतली असून, वापरही केला आहे. तसेच मुंबईतील करोनाबाधित रुग्णाने हे औषध घेतले असून, त्याचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. मात्र ते दोन दिवसांत कोनामुक्त झाल्याने प्रशासन त्यांची तपासणी करण्यास तयार नाही. हे उत्पादन अंधारात राहिले असल्याने आयुर्वेदाचे यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय, अशी खंत डॉ. वाघचौरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मुंबई विद्यापीठ सदर उत्पादनास मान्यता मिळण्यासाठी सहकार्य करत आहे.
यापूर्वी आपण अशा उत्पादनांच्या संशोधन व विकाससाठी मुंबई विद्यापीठातील जीव, भौतिकशास्त्र विभागांशी सामंजस्य करार केलेला आहे. विद्यापीठाचे प्रा. डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी या उत्पादनाची शिफारस मुंबई महापालिका, राज्य कोविड-19 टास्क फोर्स, तसेच केईएम रुग्णालयांकडे केली आहे. आयसीएमआर प्रशासनाने या उत्पादनांच्या चाचण्या जून पूर्वी घ्याव्यात. तसे झाल्यास ते बनविण्यासाठी लागणाऱ्या वनस्पतीची लागवड करावी लागेल. तिची लागवड 15 जूनपर्यंतच करावी लागेल. अन्यथा वर्षभर वाट पाहावी लागेल. याबाबत डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी आयसीएमआरशी संपर्क करावा, असे सूचित केले. त्यांनी परवानगी दिल्यास हे संशोधन जगाच्या पुढे येण्यास मदत होईल. याबाबत माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनीही आयुष मंत्रालयाशी संपर्क केला आहे. तसेच आ. आशुतोष काळे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत, असे वाघचौरे यांनी सांगितले.