महापालिका प्रशासनाचे नियोजन
पुणे – शहरातील करोनाच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करणात येत आहेत. त्याअंतर्गत पालिकेकडून तब्बल 33 कोटी 50 लाख रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दहा वेगवेगळ्या प्रकराच्या कामांसाठी हा खर्च केला जाणार आहे.
या रकमेत सर्वाधिक 10 कोटींचा खर्च उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या हॉस्पिटल खर्चासाठी प्रस्तावित आहे. शहरात करोना रुग्णसंख्या 3500 जवळ गेली आहे. तर, त्यातील सुमारे 1,751 जणांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर सुमारे 1,551 जण अद्यापही उपचार घेत असून नव्याने सापडणाऱ्या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण केले जात असून विलगीकरण केंद्रांत सुमारे 2,500 लोक आहेत. त्यात करोनाचा अहवाल प्रतिक्षेत असलेल्या संशयितांचा समावेश आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेसाठी महापालिकेस मोठ्या प्रमाणात नियोजन तसेच विलगीकरण केंद्र आणि रूग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर महापालिकेस खर्च करावा लागत आहे.
करोनाबाधित रुग्णांची वाहतूक, विलगीकरण केंद्रांत विद्युत-पाणी, वैद्यकीय सुविधा यंत्रणा, अत्यावश्यक साहित्य खरेदी यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने पालिकेने 33 कोटी 50 लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. त्यात, विलगीकरण कक्ष स्वच्छता आणि देखभालीसाठी 4 कोटी, विद्युत साहित्य खरेदीसाठी 3 कोटी, वाहतूक-वाहनांसाठी 1 कोटी 30 लाख, कोविड सेंटर दुरूस्ती (भवन विभाग) 1.5 कोटी, मध्यवर्ती भांडार खरेदी 7 कोटी, रुग्णांशी संबंधित हॉस्पिटलचा खर्च 10 कोटी, आयसीयूसाठी उपकरणे खरेदी 97 लाख, इतर साहित्य खरेदी 40 लाख, विलगीकरण कक्ष व रुग्णालय, रुग्णांच्या जेवणाचा खर्च 4 कोटी, संक्रमित भागासाठी मोबाइल टॉयलेट 1 कोटी 3 लाख रुपये अशा या तरतुदी आहेत.