पुणे – करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तसेच करोनाची लक्षणे दिसत असलेल्या रुग्णांचे घशातील स्रावाचे नमुने घेण्यापूर्वी आता संबंधित रुग्णाची माहिती थेट ऑनलाइन मोबाइल ऍपवर घेतली जाणार आहे. आतापर्यंत या रुग्णाकडून फॉर्म भरून ही माहिती संकलित केली जात होती. मात्र, “एनआयव्ही’ अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने आता हे ऍप वापरणे बंधनकारक केले आहे.
शहरात नवीन करोना रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या “क्लोज कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या तसेच पालिकेच्या घरोघरी तपासणीत आढळलेल्या संशयित नागरिकांची करोना चाचणी केली जाते. ही चाचणी करण्यापूर्वी आधी एका फॉर्मवर रुग्णाची माहिती संकलित केली जात होती. त्यानंतर ही माहिती एकत्र करून “एनआयव्ही’कडे पाठविली जात होती. मात्र, या माहिती मध्ये अनेक त्रुटी असत. तसेच संबंधित व्यक्तीचे पुन्हा स्वतंत्र रेकॉर्ड करावे लागे. त्यामुळे आता थेट ऍप विकसित करण्यात आले असून चाचणी केंद्रावर या ऍपमध्ये माहिती भरण्यासाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता रुग्णांची माहिती एका क्लिकवर संकलित होणार आहे.