पुणे – तंत्रनिकेतन, औषधनिर्माण पदविकेसह पाच अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्राच्या व शेवटच्या वर्षीची परीक्षा 9 जुलैपासून परीक्षा घेण्यात येणार आहे आणि निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे.
या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने शुक्रवारी प्रसिद्घ केले. यात सहा सत्राच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सहावे सत्र, दोन वर्षाच्या औषधनिर्माण अभ्यासक्रमातील द्वितीय वर्ष, तीन वर्षाच्या मायनिंग अभ्यासक्रमातील तृतीय वर्ष, आठ सत्रांच्या पार्टटाइम पदविका अभ्यासक्रमातील आठवे सत्र आणि शासन मान्य अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे अंतिम सत्र/वर्ष या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.
दरम्यान, करोनामुळे राज्य सरकारने सर्व अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्र किंवा वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण मंडळाच्या विद्वत समितीची बैठक दि.14 मे रोजी पार पडली. मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले. दरम्यान, यासाठी दि. 13 मार्चपर्यंत शिकवलेला अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाणार आहे.
…पण करोनाच्या स्थितीनुसार अंतिम निर्णय
राज्य तंत्र शिक्षण मंडळाने परीक्षांचे नियोजन केले आहे आणि त्यानुसार परीक्षांची तयारी सुरू आहे. मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या आडवड्यात पुन्हा एकदा तंत्रशिक्षणच्या पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यावेळची करोनाच्या स्तिथीवर परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती तंत्रशिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याकडून देण्यात आली.