उस्मानाबाद (प्रतिनिधी): ग्रीन झोनमध्ये आलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला. जिल्ह्यात परंडा तालुक्यातील सरणवाडी गावात एक फळविक्रेता कोरोना पॉझिटीव्ह सापडला आहे. सोमवारी आलेल्या अहवालामध्ये या युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये ३८ दिवसानंतर कोरोनाचा रुग्ण आढळला असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या सुरुवातीस तिघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात उमरगा भागातील तिन्ही रुग्ण होते, जिल्ह्याच्या इतर भागामध्ये सुदैवाने कोरोनाचा फैलाव झालेला नव्हता. शिवाय ते तीनही रुग्ण बरे होऊन गेल्यानंतर पुढच्या काही दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडलेला नव्हता.
उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये आल्यानंतर सदर युवक वाशी व नवी मुंबई येथे शेतातील कलिंगड व खरबुज विक्रीसाठी घेऊन जात होता. विक्री करुन गावाकडे आलेल्या त्या युवकाला ताप येवू लागल्याने त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संध्यकाळी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर प्रशासनाकडून या युवकाच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती घेण्याचे काम तातडीने सूरु करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने शहरासह जिल्ह्यातील व्यवहार सोमवार ११ मे रोजी पासून ठराविक काळात दुकाने उघडी ठेवून व्यवहार सुरळीत करण्यात आले होते. यामुळे बाजारापेठेत गर्दी वाढत चालली होती. यातच रुग्णांचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने तालुका हादरला आहे.