कराची – सट्टेबाजांशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्याने 3 वर्षांची बंदीची शिक्षा झालेल्या पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमल याने चौकशी समितीला कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या शिस्तपालन समितीने तसेच लाचलुचपत प्रतिबंधक समितीने अकमलला चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी त्याचे सट्टेबाजांशी काय बोलणे झाले, तसेच त्यांच्या एकूणच फिक्सिंग प्रकरणात विचारल्या गेलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास अकमल राजी झाला नाही.
सट्टेबाजांशी त्याचे झालेले बोलणे टॅप झाले होते. मात्र, त्याने अनेकदा सट्टेबाजांशी संवाद साधल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला सर्व माहिती विचारण्यात आली. मात्र, त्याने आपली असहकाराची भूमिका कायम ठेवली आहे.
अकमल याने पाकिस्तान क्रिकेट लिगसह इंग्लंडमधील मालिकेतही सट्टेबाजांशी संपर्क केला होता, तसेच त्यांच्याशी चर्चाही केली होती. पाकिस्तान संघातील काही क्रिकेटपटूंनीही याबाबत मंडळाला माहिती दिली होती. त्यानुसार अकमलवरील आरोप सिद्ध झाले व त्याला 3 वर्षे बंदीची शिक्षा सुनावली गेली. मात्र, या दोन्ही समित्यांना अकमलची चौकशी करून माहिती मिळविण्याचे आदेश देण्यात आले होते.