तळेगाव ढमढेरे -येथे करोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 12 व्यक्तींना शोधून काढण्यात आले असून त्यांना शाळेतील आवारात आरोग्य विभागाच्या निगराणीत या सर्वांना ठेवण्यात आले आहे. त्यांच्या घशातील द्रव्य तपासणीसाठी पुण्यात पाठविले असून नवीन रुग्ण सापडला नसल्यामुळे येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे चार रुग्ण बाधित सापडले होते त्यामधील एकाचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.
तालुक्यातील करोना बाधित व्यक्तींच्या संख्येच्या पटीत एकट्या तळेगाव ढमढेरे गावाची संख्या जास्त झाली आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील एकूण 31 व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. येथील नागरीकांनी विशेष काळजी घेतली आहे. गावातील येणारे रस्ते बंद केले आहेत.