विभागीय आयुक्तांच्या शहरातील प्रयोगशाळांना सूचना
पुणे – शहरातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांनी कोविड-19 च्या सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय आणि खासगी प्रयोगशाळा प्रमुख व समन्वयकांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साखर आयुक्त तथा कोविड-19 नियंत्रण अधिकारी सौरभ राव, एनआयव्हीच्या संचालक डॉ. प्रिया अब्राहम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख तसेच शासकीय व खासगी प्रयोगशाळेचे प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांमध्ये सध्या मोठया प्रमाणात कोविड-19 चे सॅम्पल तपासणीसाठी येत आहेत. विशेष करुन पुणे महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची संख्या वाढत असल्याने या भागातून सॅम्पल अधिक येत आहेत. या सॅम्पल तपासणीचा अहवाल वेळेत द्यावा. प्रयोगशाळांसाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक साहित्य तसेच इतर साहित्य गरजेनुसार प्रशासनाकडून पुरवले जाईल. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनीही सूचना दिल्या.
…म्हणून झोपडपट्टी भागांत संसर्ग अधिक
सौरभ राव म्हणाले, झोपडपट्टी परिसरात एक ते दोन खोल्यांच्या छोट्या घरांमध्ये 5-6 व्यक्ती राहतात, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन काटेकोरपणे होत नसल्यामुळे या भागातील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांवर वेळेत उपचार होऊन करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सॅम्पल टेस्टिंगचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. या भागात 17 तारखेपर्यंत टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करून येथील नागरिक ये-जा करणार नाहीत, यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.