अहमदाबाद – गुजरातमधील अहमदाबाद महानगर पालिकेने सोमवारी नोटांच्या धसक्यातून एक महत्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्या शहरात किराणा सामान आणि खाद्यपदार्थांची कॅशलेस डिलिव्हरी केली जाणार आहे.
नोटांमुळे करोनाचा फैलाव होत असल्याचे नमूद करत अहमदाबाद पालिकेने कॅश-ऑन-डिलिव्हरीवर बंदी घातली. आता त्या शहरात 15 मेपासून किराणा सामान आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी केवळ डिजिटल पेमेंट करता येऊ शकणार आहे. किराणा सामान आणि खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्यांसाठी पालिकेने त्यांच्या मोबाईल फोनवर आरोग्य सेतूू ऍप डाऊनलोड करणे अनिवार्य केले आहे. करोना संकटामुळे अहमदाबादमध्ये किराणा सामान आणि भाज्यांची विक्री 15 मेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. त्या मुदतीनंतरच्या विक्रीसाठी कॅशलेस डिलिव्हरीचा पर्याय अहमदाबादवासीयांना अवलंबावा लागणार आहे.
देशातील शहरांचा विचार करता करोनाबाधितांची सर्वांधिक संख्या मुंबईत आहे. त्याखालोखाल अहमदाबादचा क्रमांक लागला आहे. अहमदाबाद शहर आणि जिल्ह्यात मिळून 6 हजारांच्या आसपास करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे अहमदाबाद शहरात करोना फैलाव रोखण्यासाठी कडक स्वरूपाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.