‘आयसीएआय’तर्फे आयोजित वेबिनारमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा संवाद
पुणे – जागतिक स्तरावरील अनेक गुंतवणूकदार भारताकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. चीनमधून अनेक उद्योगांनी काढता पाय घेतल्याने त्यांना आपल्याकडे येण्याचा पर्याय आहे. अशावेळी सेवा क्षेत्रासह तंत्रज्ञानाधारीत स्टार्टअप्सना मोठ्या संधी निर्माण होणार आहेत, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या वतीने “लॉकडाऊन : नवी पहाट’वर आयोजित वेबिनारमध्ये सनदी लेखापालांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. महाराष्ट्र हौसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, ज्येष्ठ सनदी लेखापाल डॉ. एस. बी. झावरे, “आयसीएआय’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष अभिषेक धामणे, उपाध्यक्ष समीर लड्डा, सचिव काशिनाथ पठारे, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे खजिनदार आनंद जाखोटिया, यशवंत कासार आदींनी या वेबिनारमध्ये सहभाग घेतला.
फडणवीस म्हणाले, “लॉकडाऊननंतरच्या स्थितीवर मात करण्यासाठी मार्गही आपल्याला शोधावे लागणार आहेत. केवळ व्यवसाय सुरू होणे, याला आपले प्राधान्य नको, तर आर्थिक गतिविधी पूर्ण ताकदीने सुरू होतील, याचा विचार करावा लागणार आहे. ई-लर्निंग, नवीन डिजिटल बाजारपेठ, घरातून काम करणे, नवीन व्यावसायिक परिस्थिती, नवीन गुंतवणूक संधी इत्यादी अनेक बाबी स्वीकाराव्या लागतील.
स्थानिक पातळीवर आपल्याला उत्पादन आणि नवनिर्मिती करावी लागणार आहे. त्यातून आयात निर्बंधित होईल. बांधकामासह कृषी, पर्यटन, शिक्षण आदी क्षेत्रात आपल्याला आमूलाग्र बदल करावे लागतील. सरकार, बॅंका आणि उद्योग यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच अर्थव्यवस्था बळकट होईल.’
कृषीनंतर बांधकाम क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्मिती होते. मात्र, आधी जागतिक मंदी आणि लॉकडाऊनमुळे या क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अल्प उत्पन्न आणि आर्थिक मागास वर्गासाठी घरांची निर्मिती गरजेचे आहे. करांमध्ये सवलती मिळाव्यात. प्रस्ताव अडकवून ठेवू नयेत. जीएसटी सूट देण्यासह बांधकाम साहित्याचे दर निश्चित करावेत. विकसकांना मिळणारा निधी लवकर मिळणे आवश्यक आहे.
– राजेंद्र मिरगणे, सहअध्यक्ष, महाराष्ट्र हौसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन