आंबेठाण -पुणे जिल्हा रेड झोनमध्ये असला तरी थांबलेल्या अर्थव्यवस्था बुस्टर मिळावे म्हणून औद्योगिक वसाहत सुरू करण्यास राज्य शासनाने काही अटी शर्तींवर परवानगी दिली आहे. त्यानुसार चाकण (ता. खेड) येथील 130 कंपन्यांनी बस सेवा सुरू करण्यास पोलिसांनी मंगळवारी (दि. 5) परवानगी दिली असल्याची माहिती महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिली.
महाळुंगे इंगळे येथील बजाज कंपनीच्या हॉलमध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने सोमवारी (दि. 4) बैठक बोलावण्यात आली होती. गुन्हे व वाहतूक विभागाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांच्या हालचालींच्या व कंपनी सुरू करण्याच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने चर्चा झाली. कामगारांचे स्थलांतर थांबवायचे असल्यास कंपनी सुरू करणे व कामगारांना काम देणे हा पर्याय असल्याने ग्रामीण भागातील कंपन्या सुरू करण्याची काही अटी व शर्तीवर परवानगी दिली असल्याचे पिंपरी चिंचवडच्या उपायुक्ता स्मिता पाटील यांनी सांगितले.