सातारा: कंटेनमेंट झोनच्या हद्दी गरजेपुरत्या मर्यादीत ठेवण्यात येणार आहेत. सातारा व कराड शहरे वगळता शहरी तसेच ग्रामीण नॉन कंटेनमेंट क्षेत्रात मर्यादित स्वरुपात हालचालींना लवकरच मुभा देण्यात येईल. जिल्हयातील कंटेनमेंट झोनमधील जीवनावश्यक सुविधा व औद्योगिक क्षेत्र यांना टप्याटप्याने परवानगी देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होत्या. सध्याच्या कन्टेमेंट झोनमध्ये सध्या जी स्थिती आहे, त्याप्रमाणेच सर्व बंद राहिल. फक्त किराणा घरपोच करण्याला मुभा देण्यात आली आहे. मात्र येत्या काही दिवसांत त्यात बदल होईल. राज्य शासनाच्या नव्या निर्देशानुसार कंटेनमेंट झोनच्या हद्दी करोनाबाधित रुग्ण असेल त्या गल्लीपुरत्या मर्यादित ठेवण्यात येतील, असे स्पष्ट करुन शेखर सिंह म्हणाले, “”यापूर्वी 3 व 5 किलोमीटर परिसरात गाभा (कोअर) आणि झालर (बफर झोन) क्षेत्र होते.
यापुढे विशेषत: शहरी भागात स्थानिक परिस्थितीनुसार हे क्षेत्र निश्चित करण्यात येईल. नव्या कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या सवलती राहणार नाहीत. औषधे, भाजी, दूध आदींची घरपोच व्यवस्था सध्याप्रमाणे सुरु राहिल. इतर नॉन कंटेनमेंट क्षेत्रात काही दिवसांत हालचालींना सवलत दिली जाईल, शहरी आणि ग्रामीण नॉन कंटेनमेंट क्षेत्रात दुचाकी व चारचाकी वाहनांना अध्यादेश आल्यानंतर परवानगी दिली जाईल. दुचाकीवर फक्त एक आणि चारचाकीत चालक अधिक दोन जण अशाच प्रवाशांना खासगी वापरास परवानगी असेल. अर्थात सूचना आल्यानंतर ही मुभा मिळेल.
मॉल्स, व्यापारी संकुले आदी ठिकाणी कापड, सराफी दुकान आदी प्रकारच्या अत्यावश्यक नसलेली दुकाने उघडता येणार नाहीत. फक्त औषधे, फळे- भाजीपाला, किराणा, कृषीशी निगडित दुकाने, ट्रॅक्टर दुकाने लवकरच सुरु करण्यात येतील.” बाजारपेठेशिवाय रहिवास भागात सर्व प्रकारची दुकाने सुरु करता येऊ शकतील. मुख्य बाजारपेठेत मात्र अत्यावश्यक बाबींचीच दुकाने सुरु राहतील.
प्रांत, मुख्याधिकारी यासंदर्भात एकत्रित निर्णय घेतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकाने खुली करण्याबाबत अद्याप तरी विचार नाही. सध्यातरी दारू दुकाने बंदच राहतील. भविष्यात धोरण जाहीर केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पोलादपूर महाबळेश्वर, शिरवळ, बारामती- फलटण, नीरा- लोणंद, पिलिव- म्हसवड, कासेगाव- मालखेड अशा चेक पोस्टवरूच जिल्ह्यात प्रवेश करता येईल, मात्र त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. परराज्यातील व्यक्तींकडून घरी जाण्यासाटी ऑनलाइन नोंदणीचे काम सुरू आहे.
सध्या राजस्थानमधील नोंदणी पुरेशी झाली असून रेल्वे प्रशासनाशी चर्चा सुरू असून दोन दिवसांत राजस्थानसाठी रेल्वे सोडण्याचे प्रयत्न आहेत. असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील तालुक्यातालुक्यात प्रवेश करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी दिली जात आहे. मात्र, कन्टेनमेंट क्षेत्रात जाण्यासाठी मुभा नाही, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.
घरपोच किराणा मालातही निवडक वस्तूच मिळणार
सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहूपुरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर, समर्थनगर, धनगरवाडी या ग्रामपंचायत क्षेत्रात व सातारा नगरपालिका व त्रिशंकू क्षेत्रात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने गावांमध्ये व सातारा नगर पालिका हद्दीमधील प्रभागनिहाय दुकानदारांना किराणा माल घरपोच करण्यासाठी यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे.
परवानगी देण्यात आलेल्या किराणा माल दुकानदारांनी दुकानातून आटा (गव्हाचे पीठ), तांदूळ, ज्वारीचे पीठ, डाळ, कडधान्य, मीठ, तेल, तिखट, चहा पावडर, साखर, बेसन पीठ, पोहे, साबण, शेंगदाणे, गूळ, रवा, मैदा, भगर, शाबुदाणा, सॅनिटायझर, मसाले पदार्थ या वस्तुंचीच विक्री करावी, असे आदेश सातारचे प्रांताधिकारी तथा इन्सिस्टंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी सुधारीत आदेश जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी म्हणाले…
बाधित असलेल्या गल्लीपुरती मर्यादित कंटेनमेंट झोनची हद्द
सातारा- कराड- जावळीतील कन्टेनमेंट झोनमध्ये मयादित मुभा
नव्या कंटेनमेंट झोनमध्ये कोणत्याही सवलती नसतील
शहरी व ग्रामीण नॉन कंटेनमेंट क्षेत्रात हालचालींना लवकरच सवलती
स्थानिक खासगी प्रवासाला मर्यादेत सूट
बाजारपेठेत फक्त अत्यावश्यक दुकानेच उघडतील
बस- रिक्षा, थिएटर, मॉल तूर्त बंदच
नऊ चेकपोस्टवरून परजिल्हयातील नागरिकांना प्रवेश- वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक