सातारा(प्रतिनिधी)-सातारा शहरात करोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हा प्रशासनाने शहर व संपूर्ण परिसर बुधवारी रात्री १२ पासून शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सातारा शहर, खेड, गोडोली, शाहूनगर, शाहूपुरी, सैदापुर, शाहूपुरी, वाढे, कोडोली, संभाजीनगर हा सर्व भाग शंभर टक्के लॉक डाऊन असणार आहे. दवाखाने – नर्सिंग होम सुरू राहिल. इतर सर्व प्रकारची
दुकाने बंद असणार आहेत. या काळात फक्त गॅस सिलेंडर घरपोच देण्याची व्यवस्था असेल. त्याशिवाय प्रांताधिकाऱ्यांमार्फत औषधे व दूध घरपोच देण्याबाबत नियोजन होईल, त्यानुसार त्या त्या विभागातील औषध व दूध विक्रेत्यांना फोन करुन औषध व दूध घरपोच मिळणार आहे.
करोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेशानुसार सातारा तालुक्यातील नजीकच्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र व नगरपालिका व त्रिशंकू क्षेत्र प्रतिबंधात्मक क्षेत्र करण्याकरीता प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर सातारा यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा तालुक्यात जास्त प्रमाणात करोना विषाणूंचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत असल्याने सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर या ग्रामपंचायतींचे क्षेत्र तसेच सातारा नगरपालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र या संपूर्ण या कंटेनमेंट झोनमध्ये ३० एप्रिल रोजीच्या रात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.
त्यानुसार सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर या ग्रामपंचायतींचे क्षेत्र तसेच सातारा नगरपालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र या संपूर्ण क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस २ पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
• या प्रतिबंधित क्षेत्रात दवाखाने, हाँस्पिटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
• या प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवेतील घरगुती गॅस सिलेंडर घरपोच वितरणासाठी या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
• या प्रतिबंधित क्षेत्रात औषधे व दुध घरपोच पुरविण्याबाबत प्रांताधिकारी तथा इन्सीडंट कमांडर सातारा ज्याप्रमाणे यंत्रणा उभारतील त्याप्रमाणे औषधे व दुधपुरवठा घरपोच पुरविण्यात येईल.
• या प्रतिबंधीत क्षेत्रातील शिवराज पेट्रोलियम, कणसे ढाब्याशेजारी सातारा कदम पेट्रोलियम ,राधिका रोड सातारा केतन दोशी, सातारा पेट्रोलियम, शाहू स्टेडीयम शेजारी, सातारा हे ३ पेट्रोलपंप वगळून इतर सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. या पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त केले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनांना इंधनपुरवठा करण्यात यावा. निकडीच्या प्रसंगी रुग्ण असल्याची खातरजमा करुनच रुग्णाची वाहतूक करणा-या वाहनांसाठीच मर्यादीत स्वरुपात इंधन पुरवठा करणेत यावा.
• या आदेशामधून अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणारे शासकीय, निम शासकीय, खाजगी अधिकारी कर्मचारी वगळणण्यात येत आहेत.
• या प्रतिबंधित क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेतील शासकीय कार्यालये चालू राहतील.
• शासन मान्य शिवभोजन थाळीची सूविधा चालू राहील.
• प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्य विषयक माहिती संकलित करणेकामी नियुक्त करणेत आलेल्या कर्मचाऱ्यांना चूकीची माहिती देणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून अशी चूकीची माहिती देणा-या विरुध्द कठोर कारवाई करणेची तरतूद आहे. त्यामुळे विचारलेली माहिती न लपविता पूर्णपणे तसेच अचूकरित्या नागरिकांनी द्यावी. व नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांशी सौजन्याने वागावे.
• या प्रतिबंधित क्षेत्रासाठी यापुर्वी वेगवेगळया विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रद्द करण्यात आले आहेत. यापूर्वी नियुक्त केले अधिकारी, कर्मचारी यांचेपैकी अत्यावश्यक असलेले अधिकारी- कर्मचारी यांनाच प्रांतिधिकारी तथा इन्सीडंट कमांडंर सातारा यांनी स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत करावा. वितरीत करण्यात येणाऱ्या ओळखपत्र तसेच वाहन परवान्यावर क्रमांक, दिनांक, वेळ व कार्यक्षेत्र यांचे वैधतेसह आवश्यक असणारा सर्व तपशिल नमूद करावा.
• पोलीस विभागाने त्यांचेशी निगडीत बाबींच्या अनुषंगाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, भारतीय दंड विधान कलम 188 व इतर कायद्यातील लागू असलेल्या तरतूदीनुसार गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही पोलीस प्रशासनाने करावी, असेही आदेशात म्हटले आहे.